शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद

शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद !
23-04-2008


मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) - काल महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याचे तीव्र पडसाद आज शिक्षणक्षेत्रातील घटकांमध्ये उमटले आहेत.
(सरकारच्या या निर्णयाला हसावे कि रडावे ! समस्येच्या मुळाशी न जाता वरवरचे उपाय करणारे सरकार काय कामाचे ? राज्यकर्त्यांनी समाजात पाश्चात्त्य संस्कृती रुजवल्याने मुले संस्कारहीन बनली आहेत. त्याला कारणीभूत राज्यकर्त्यांना हटवण्याशिवाय क्रांतीला पर्याय नाही ! - संपादक)सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व पालक या घटकांकडून तीका नाराजी व्यक्‍त करण्यात आली. अशा प्रकारचा निर्णय केंद्रशासनाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आला होता. त्याला समाजसेविका प्रा. प्रतिभा नैथानी यांनी तीव्र विरोध केला होता. सरकारच्या विरोधात प्रा. नैथानी यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. जेथे या प्रकरणी केंद्र सरकारने माघार घेतली असतांना महाराष्ट्र सरकार कोणत्या आधारावर हा निर्णय घेत आहे, असा प्रश्‍न प्रा. नैथानी यांनी उपस्थित केला आहे. हा विषय शाळेत शिकवण्याचा नाही, अशीच ठाम भूमिका आमची असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रशासनाच्या विरोधात या प्रकरणी याचिका दाखल केल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय संसदीय समिती स्थापन केली. ही समिती देशभर भ्रमंती करत असून त्या माध्यमातून या विषयाबाबत पालक, शिक्षक व विद्यार्थी यांची मते जाणून घेत आहे. केंद्र सरकारने ज्या अर्थी या प्रकरणी जनमत समजून घेण्याचे ठरवले आहे, मग महाराष्ट्र शासनाला असा विचार का करावासा वाटला नाही, असाही प्रश्‍न प्रा. नैथानी यांनी केला आहे. सध्या केंद्रशासन पुरस्कृत शाळांच्या अभ्यासक्रमातून हा विषय काढून टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनालाही हा विषय उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात समाविष्ट करू देणार नाही. (शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाला विरोध करणार्‍या प्रा. नैथानी यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यालाही तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला असून उद्या सरकारच्या विरोधात आझाद मैदान येथे निदर्शने करण्यात येणार असल्याचेही प्रा. नैथानी यांनी सांगितले.

No comments: