राणी लक्ष्मीबाई



रे हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।

ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।

तांबेकुलवीरश्री ती नेवाळकरांची कीर्ति

हिंदुभूध्वजा जणु जळती ।

मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।

रे हिंदबांधवा ।।१।।


घोड्यावर खंद्या स्वार

हातात नंगि तलवार

खणखणा करित ती वार

गोर्‍यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली

रे हिंद बांधवा ।।२।।


कडकडा कडाडे बिजली

इंग्रजी लष्करे थिजली

मग कीर्तिरूप ती उरली

ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली

रे हिंद बांधवा ।।३।।


मिळतील इथे शाहीर

लववितील माना वीर

तरू, झरे ढाळतील नीर

ह्या दगडा फुटतील जिभा कथाया

कथा सकळ काळी

रे हिंद बांधवा ।।४।।


कवी - भा.रा. तांबे (१९३९)

No comments: