सर्व कामकाज मराठीतून करण्याच्या आदेशाला अधिकार्‍यांकडूनच हरताळ

सर्व कामकाज मराठीतून करण्याच्या आदेशाला अधिकार्‍यांकडूनच हरताळ !
01-06-2008

मुंबई महापालिकेतील मराठीद्वेष्टे अधिकारी !
मुंबई, १ जून (वार्ता.) - राज्यातील सरकारी कार्यालयांत व महापालिकेत शंभर टक्के कामकाज मराठी भाषेतूनच व्हावे, असा शासनाचा आदेश आहे. महापालिकेत तसा ठरावही मंजूर झाला आहे. आयुक्‍त डॉ. जयराज फाटक यांनी १७ मे रोजी एका परिपत्रकाद्वारे शंभर टक्के कामकाज मराठी भाषेतूनच करण्याचा आदेश खातेप्रमुखांना दिला आहे; मात्र इंग्रजाळलेले अधिकारीच आज मराठीऐवजी इंग्रजी भाषेतून प्रसिद्धीपत्रके व अहवाल पत्रकारांना देऊन शासन आणि आयुक्‍त यांच्या आदेशाला हरताळ फासत आहेत.
(शासन व आयुक्‍त यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या अशा मराठीद्वेष्ट्या अधिकार्‍यांवर शासन काय कारवाई करणार आहे ? - संपादक) पालिका आयुक्‍त दर शुक्रवारी पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेतात. या पत्रकार परिषदेत देण्यात येणारी प्रसिद्धीपत्रके व अहवाल हे मराठी भाषेत कमी व इंग्रजी भाषेत अधिक असतात. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेतही आरोग्यविषयक अहवाल व नालेस्वच्छतेचा अहवाल हे दोन्ही अहवाल इंग्रजी भाषेत देण्यात आले. (भाषाभिमानी पत्रकारांनो, असले मराठीद्वेष्टे अहवाल स्वीकारू नका ! - संपादक) याबाबत अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. किशोर गजभिये यांना पत्रकारांनी विचारले असता ``मराठी भाषेतील अहवाल नंतर देण्यात येईल'', असे उत्तर त्यांनी दिले. (नंतर का ? हे अहवाल आधीच मराठीतून का तयार केले नाही ? पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यावर अशा प्रकारे सारवासारव करण्यात काय अर्थ आहे ? - संपादक) पाणी खात्यामार्फत दरवेळी इंग्रजी भाषेतच पाणीकपात व जलवाहिनी दुरुस्तीच्या संदर्भातील माहिती दिली जाते. `मराठी भाषेत कामकाज व्हावे, यासाठी आग्रही असलेले सत्ताधारी शिवसेना-भाजप या पक्षांचे नेते व नगरसेवक याबाबत गप्प का, मनसेचे गटनेते व नगरसेवक हे सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांना याबाबत जाब का विचारत नाहीत', असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. (मराठीप्रेमींनो, हे आहे या पक्षांचे मराठीप्रेम ! - संपादक)

No comments: