`मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही मनसेकडून शाळेत तोडफोड

पुणे येथील `मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही ! मनसेकडून शाळेत तोडफोड !
15-08-2008

पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) - येथील `मर्सिडीज बेंझ' या आंतरराष्ट्रीय शाळेत आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या शाळेत जाऊन तोडफोड केली. या वेळी या कार्यकर्त्यांनी `शाळेत राष्ट्रीय सण का साजरे केले जात नाहीत ?', याबाबत शिक्षकांना जाब विचारला.
(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सदर शाळेला जाब विचारावासा वाटतो, मग शासन अथवा प्रशासन यांना असे काही शाळेला विचारावेसे का वाटत नाही ? - संपादक) `मर्सिडीज बेंझ' ही शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही शाळेत ध्वजारोहण करण्यात आलेले नाही. (एक शाळा राष्ट्रीय सण साजरा करत नाही व ही गोष्ट शासन आणि प्रशासन यांच्यासह शाळेत शिकणारे भारतीय विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेच्या आजूबाजूचे नागरिक हे सर्वच जण खपवून घेतात, ही बाब भारतियांच्या राष्ट्रविषयक जाणिवा किती मेलेल्या आहेत, याची निर्देशक आहे ! - संपादक)
सदर बाब मनसेने एका पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती व `आंतरराष्ट्रीय शाळांत ध्वजारोहण व्हायलाच पाहिजे', अशी मागणीही केली होती; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी आज या शाळेत फिरकलाही नाही. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील सामान व सुरक्षारक्षकाचा कक्ष यांची मोडतोड केली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

No comments: